कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळच्या वतीने गेल्या तीन वर्षांपासून राबविण्यात येत असलेल्या ‘दूध वाढ गुणवत्ता सुधारणा’ कार्यक्रमाला आता अधिक व्यापक स्वरूप मिळाले आहे. सुधारित कार्यपद्धतीमुळे कार्यक्रमाची अंमलबजावणी अधिक गतिमान आणि प्रभावी होणार असून, सुमारे ८ हजार ५०० हून अधिक दूध उत्पादकांचा यामध्ये सहभाग राहणार आहे.
गोकुळ दूध संघाचे प्रशासकीय अध्यक्ष प्रदीप मलगावे आणि प्रशासकीय मंडळाच्या सदस्यांच्या हस्ते संकलन विभागातील अधिकाऱ्यांना कार्यक्रमासंदर्भातील सूचना व साहित्याचे वितरण करण्यात आले. दूध उत्पादन वाढविण्यासोबतच दुधाची गुणवत्ता सुधारण्यावर या उपक्रमात विशेष भर देण्यात आला आहे.
कार्यक्रमाच्या पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील २५४ गावांची निवड करण्यात आली आहे. प्रत्येक गावातील पाच याप्रमाणे सुमारे १ हजार २७० दूध संस्थांमध्ये हा कार्यक्रम राबविला जाणार आहे. यामध्ये गोठा व्यवस्थापन आणि दूध व्यवसाय सुधारणा या बाबींवर विशेष काम केले जाणार आहे.
तसेच निवड झालेल्या दूध उत्पादकांच्या पती-पत्नींना गोठा व्यवस्थापन, पशुआरोग्य, वैरण, पशुखाद्य आणि दूध उत्पादन वाढ याबाबत प्रशिक्षण दिले जाणार आहे. संबंधित गावांतील दूध संस्था व उत्पादकांमध्ये दूध व्यवसाय सुधारणा कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी केली जाणार आहे.
या उपक्रमांतर्गत संकलन, पशुसंवर्धन, वैरण विकास, आहार संतुलन, पशुखाद्य, कृत्रिम रेतन, आर.बी.पी., महिला नेतृत्व विकास, जंतनिर्मूलन, लसीकरण, सी.एम.टी. तपासणी, वंध्यत्व निवारण, गोचीड नियंत्रण, सायलेज, सुधारित वैरण आणि संतुलित आहार यांसारख्या विविध बाबींवर मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
