
कडगाव / प्रतिनिधी :
मुरगूड तालुक्यातील कारीवडे परिसरात बिबट्याने अचानक केलेल्या हल्ल्यात श्री. पांडुरंग शंकर देसाई व श्री. यशवंत शिवा देसाई हे दोन शेतकरी गंभीर जखमी झाले. पाळीव जनावरे चरण्यासाठी शेतकरी आपल्या खासगी शेतजमिनीत गेले असता बिबट्याने अचानक त्यांच्यावर हल्ला केला. या घटनेमुळे परिसरातील शेतकरी व ग्रामस्थांमध्ये मोठी भीती निर्माण झाली आहे. हल्ल्यात काही पाळीव जनावरेही जखमी झाल्याचे समोर आले आहे.
गेल्या काही दिवसांपासून ग्रामीण भागात बिबट्या तसेच इतर वन्यप्राण्यांचा वावर वाढला असून शेतकऱ्यांसमोर नवे संकट उभे राहिले आहे. आधीच शेतीची मशागत, पिकांचे संरक्षण आणि नैसर्गिक संकटांशी सामना करताना शेतकऱ्यांची मोठी दमछाक होत असताना वन्यप्राण्यांकडून पिकांची नासधूस होत आहे. त्याचबरोबर आता थेट मानव व पाळीव जनावरांवर हल्ले होऊ लागल्याने शेतकऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला आहे.
वन्यप्राण्यांचा उपद्रव रोखण्यासाठी यापूर्वीच वनविभागाकडे हत्तीचर, सोलार कुंपण तसेच आवश्यक संरक्षणात्मक उपाययोजना करण्याबाबत पाठपुरावा करण्यात आला होता. मात्र, या मागण्यांकडे वनविभागाने गांभीर्याने लक्ष दिले नसल्याची नाराजी ग्रामस्थांकडून व्यक्त होत आहे.
वनविभागाकडून छोट्या-मोठ्या कारणांवरून नागरिकांना कायद्याची भाषा सांगितली जाते; मात्र वन्यप्राण्यांकडून होणारे हल्ले, पिकांची नासधूस आणि शेतकऱ्यांचे होणारे नुकसान रोखण्यासाठी ठोस उपाययोजना करण्यात प्रशासन अपयशी ठरत असल्याचा आरोप ग्रामस्थांकडून केला जात आहे.
ग्रामीण भागात वन्यप्राण्यांचा वाढता वावर लक्षात घेता वनविभागाने तातडीने गस्त वाढवावी, बिबट्याचा बंदोबस्त करावा, सोलार कुंपण व इतर प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात तसेच शेतकरी व नागरिकांच्या जीविताचे संरक्षण करावे, अशी मागणी ग्रामस्थांमधून जोर धरत आहे.
