पाचगाव येथील योगेश्वरी कॉलनी परिसरात पती-पत्नीच्या वादातून धक्कादायक घटना घडली. पत्नीवर हल्ला केल्यानंतर पतीचा मृत्यू झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी करवीर पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत तपासाला सुरुवात केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गणेश कदम याने रविवारी (दि. १६) सकाळी पत्नी दिपाली कदम हिच्यावर हल्ला केला. या घटनेत दिपाली गंभीर जखमी झाली असून तिच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती आहे. दरम्यान, हल्ल्यानंतर गणेश याचा मृत्यू झाल्याचे समोर आले.
गणेश आणि दिपाली यांचा सुमारे दहा वर्षांपूर्वी प्रेमविवाह झाला होता. गेल्या काही वर्षांपासून कौटुंबिक कारणातून दोघांमध्ये वारंवार वाद होत असल्याचे प्राथमिक माहितीतून समोर आले आहे.
घटनेच्या काही दिवसांपूर्वी दिपाली माहेरी गेली होती. रविवारी सकाळी ती कपडे घेण्यासाठी गणेशच्या घरी आली असताना दोघांमध्ये पुन्हा वाद झाला. त्यानंतर झालेल्या घटनेत गणेशचा मृत्यू झाला, तर दिपाली गंभीर जखमी झाली.
घटनेची माहिती मिळताच करवीर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे. या घटनेमागील नेमके कारण आणि संपूर्ण परिस्थिती तपासातून स्पष्ट होणार आहे.
या घटनेमुळे पाचगाव परिसरात एकच खळबळ उडाली असून, पोलिसांकडून या प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे.
